Thursday, November 11, 2010

कोपरा

    एक कोपरा मनातला मी खोदत होतो
       मीच गाडले भरात ज्याला,शोधत होतो
                    चंद्र वाटतो जरी तुम्हाला लोभसवाणा
                     भोग त्यास जे कलाकलांचे,जाणत होतो
        मोकळेपणा घराघरांचा संपत आहे
        रोज आयत्या फुटाफुटांना मोजत होतो
                      लक्ष झोपड्या, हजार वस्त्या, किंमत मोठी
                       काल वादळासमोर मी ती मांडत होतो
       कोण आपले? मनात ठेवू, सावध राहू
       वेळ नेमकी अशीच मीही साधत होतो
                        प्रेम कोणत्या वयात होते सांगत नाही
                         प्रेम कोणत्या वयात कळले सांगत होतो 

Friday, October 22, 2010

नाते

       नाते किती जपावे
       नाते कसे जपावे
       व्हावे तसेच नाते
       लागू नये जपावे
             नाते कुठे असावे
             नाते कधी असावे
             वाटे हवेच नाते
             तेव्हा तिथे असावे
        नाते असे दिसावे
        नाते तसे दिसावे
        चर्चा कशास नाते
        नुसतेच ना दिसावे

वाटणी

                   वाटणी झाली तर ते पाप कसं
                   सुखानं वेगळं नांदणं शाप कसं
                   भिंती मनाच्या असतात
                   एकत्र असणं प्रेमाचं माप कसं

पुन्हा नव्याने

काळाचे संदर्भ बदलले पुन्हा नव्याने
आणि काहींना अवघडले पुन्हा नव्याने
खोटे नाही! मी घुटमळलो जरा जुन्याशी
आशेचे काही क्षण दिसले पुन्हा नव्याने
उंची माझी सोसत नव्हती तशी कुणाला
आभाळाशी हात मिळवले पुन्हा नव्याने
दुःखाच्या तक्क्यावर बसलो उजाडलेला
मायेने काळीज उघडले पुन्हा नव्याने
मातीच्या देहात उकिरडे नको फुलाया
मातीच्या गर्भात मिसळले पुन्हा नव्याने
पूर्वेच्या लालीवत दिसला प्रकाश जेव्हा
या रक्ताचे डाग पुसटले पुन्हा नव्याने
अर्थाने जो दार किलकिले स्वतःच केले
शब्दांचेही भान हरपले पुन्हा नव्याने
प्रेमाने हा खेळ निवडला जुनापुराणा
कोणाचे काळीज निवडले पुन्हा नव्याने?

एक

       

    एक अक्षर उमटावे अंतरीचे,
    एक शब्द पोचावा सार्थ,
    एक वाक्य यावे संवादी त्या ह्रदयाला,
    एक परिच्छेद व्हावा माणसांचे प्रश्न मांडणारा
    नेमका पण असोशीने,
    एक लेख साधावा सुबद्ध
    जो आधारभूत जाणीवांना

एक प्रकरण जुळून यावे साकल्याने नि सातत्याने प्रवाही
पण चिरंतन संकल्पनेचे,
एक ग्रंथ साधावा जीवनांना उजळून टाकणारा
काही काळ तरी
दुसरा सरस पण तीच शाश्वत मूल्ये सांगणारा येईतो

     मग माझ्या अस्तित्वाचा कुठलाही आग्रह न धरता
     निघून जाईन नि:शंक मनाने

Wednesday, September 22, 2010

ठेच



    जशी ठेच लागावी सारे पुढचे दिसूनही
      चुका टाळता आल्या कोठे मजला कळूनही?
 वसंतातल्या रंगानेही मजला विचारले
 तुला पाखरु वेडे कोणी दिसले चुकूनही?
      तुझ्यावाचुनी नंतर येथे घडले बरेचसे
      असे वाटते घडले नाही इतके घडूनही
"किती सांग आयुष्या,खेळू असला जुगार मी?"
तुझी नेहमी फत्ते माझे इतके पिसूनही
       तुला नेमके ऐकू येते हृदयातले कसे?
       तुला तेवढे सांगायाचे असते म्हणूनही
तुझे पांग फेडाया नाही जमले ,जमायचे
तुला बोल लावाया का मी धजतो अजूनही?
       तुझे मौन सख्खे सांभाळी घर आपुल्यापरी
       अता सौख्य येता जाताना दिसते कुठूनही